पेरु हे सर्वांना परिचित असणारे झाड आहे . हे फळ संस्कृतात बहुबीज म्हणून ओळखले जाते . काशीकडे याला अमृत म्हणतात . या झाडाची कोवळी पाने लहान मुलांच्या हगवणीसाठी अत्युत्तम औषध आहे . पेरुची कोवळी पाने आणून ठेचून त्याचा सोळावा हिस्सा काढा करावा व लहान मुलांच्या अतिसारात थोडा थोडा पाजावा . लहान मुलाला संग्रहणी म्हणजे दर महिना २ महिन्यांनी फार परसाकडे होणे , पोट फुगणे , अन्न न खाणे , मुलाचे हातपाय बारीक , मूल कृश होणे ह्यासाठी पेरुच्या पानांचा व सालीचा काढा उपयोगी पडतो . लहान मुलांना वरचेवर परसाकडे होऊन लहान मुलाचे अंग बाहेर येते , त्यावर पेरुच्या सालीच्या काढ्यासारखे औषध नाही . ह्यासाठी पेरुची साल पावभार ठेचून त्याच्यात दोन लिटर पाणी घालून अर्धा लिटर उखावे मग दरवेळी अंग काढ्याने धुवून आत ढकलावे .

                 पटकी अथवा कॉलरा यात जुलाब उलटीवर सालीचा अथवा पानाचा काढा देतात , गुण येतो . अपचनावर पानाचा रस खडीसाखरेबरोबर देतात . भूक लागते . सात दिवसात बरे वाटते . भांग अथवा धोत्रा याने निशा आली असेल तर उतारा म्हणून पेरु खावा . शक्ति येण्यास पेरुची शिकरण खावी . चांगले पिकलेले पेरु कुस्करून त्याचा मलिदा करावा . त्यांत दूध घालून गाळून घ्यावे , सर्व बिया बाजूस होतात . रुचीप्रमाणे आवडेल तेवढी साखर घालून घ्यावी . पेरुचे लोणचे , कोशिंबीर करतात . पेरुचा आंब्याप्रमाणे मुरंबादेखील करतात . पेरुचा मोठा उपयोग : - सुका खोकला पेरु खाल्ल्याने जातो . ज्या ठिकाणी पुष्कळ पेरु होतात तेथील अनुभव आहे . जास्त सुका खोकला येतो , खोकून खोकून जीव कासावीस होतो पण कफ पडत नाही व दिवसेंदिवस क्षीण होत जातो , अशा रोग्यानी रोज पहाटे चांगला पिकलेला पेरु लोखंड न लावता दाताने चावून खावा . असे २ / ३ दिवस करतांच सुका खोकला अजीबात जातो . पेरु फार खाऊ नये . हिवताप लागतो . फार जपून खावा .
                    Sojwal patil

Downdload App